पुण्यातील शिक्षण क्षेत्राला हादरवून सोडणाऱ्या ‘NEET पेपर लीक’ प्रकरणात मोठा खुलासा झाला आहे. आयुष्यभर विद्यार्थ्यांना शिक्षण देणाऱ्या एका वरिष्ठ प्राध्यापिकेवरच आता प्रश्नपत्रिका फुटीचा गंभीर आरोप झाला आहे. पुण्यातील नामांकित मॉडर्न महाविद्यालयातील वनस्पतिशास्त्र विभागाच्या प्राध्यापिका मनीषा गुरुनाथ मांढरे यांना केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) अटक केली आहे. या घटनेमुळे शैक्षणिक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.
Table of Contents
२४ वर्षांची कारकीर्द एका आरोपाने धुळीस मिळाली
मनीषा मांढरे गेली तब्बल २४ वर्षे अकरावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना वनस्पतिशास्त्र विषय शिकवत होत्या. शिक्षण क्षेत्रातील त्यांचा अनुभव आणि विषयातील प्रभुत्व लक्षात घेऊन राष्ट्रीय परीक्षा संस्था (NTA) यांनी त्यांची प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्या तज्ज्ञ समितीत नियुक्ती केली होती. मात्र, याच जबाबदारीचा गैरवापर केल्याचा आरोप आता त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
विशेष म्हणजे, अवघ्या सात महिन्यांनंतर त्या सेवानिवृत्त होणार होत्या. पण त्याआधीच या प्रकरणामुळे त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
विद्यार्थ्यांना घरी बोलावून घेतली ‘विशेष शिकवणी’
CBI च्या प्राथमिक तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, मांढरे यांना वनस्पतिशास्त्र आणि प्राणिशास्त्र या दोन्ही विषयांच्या प्रश्नपत्रिकांमध्ये प्रवेश होता. एप्रिल २०२६ दरम्यान त्यांनी पुण्यातील मनीषा वाघमारे यांच्या मदतीने काही निवडक विद्यार्थ्यांना संपर्क साधला.
यानंतर विद्यार्थ्यांना स्वतःच्या घरी बोलावण्यात आले. तिथे कथितरित्या ‘विशेष मार्गदर्शन वर्ग’ घेण्यात आले, ज्यामध्ये परीक्षेत येणारे प्रश्न आणि त्यांची उत्तरे विद्यार्थ्यांना सांगण्यात आली. या बदल्यात लाखो रुपये घेतल्याचा आरोप तपास यंत्रणांनी केला आहे.
परीक्षेत तेच प्रश्न आल्याचा तपासात दावा
३ मे २०२६ रोजी झालेल्या NEET परीक्षेत शिकवण्यात आलेले अनेक प्रश्न जुळल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे या प्रकरणाकडे केवळ आर्थिक गैरव्यवहार म्हणून नव्हे, तर लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ झाल्याच्या दृष्टीने पाहिले जात आहे.
महाराष्ट्रात जुलैपासून ‘लँड टायटलिंग ॲक्ट’ लागू; देशात अशी ऐतिहासिक पाऊल उचलणारे पहिले राज्य ठरणार
CBI आता या संपूर्ण रॅकेटमध्ये आणखी कोण सहभागी होते, याचा तपास करत आहे. काही मध्यस्थ आणि इतर शैक्षणिक घटकांची चौकशी सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.
महाविद्यालय आणि संस्थेकडून कठोर भूमिका
या घटनेनंतर प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीने तातडीने या प्रकरणाची दखल घेतली आहे. संस्थेकडून नियमांनुसार शिस्तभंगाची कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
या कारवाईमुळे मांढरे यांना सेवानिवृत्तीनंतर मिळणारे लाभ, मान-सन्मान आणि इतर सुविधा धोक्यात आल्याची चर्चा शैक्षणिक वर्तुळात सुरू आहे.
शिक्षण व्यवस्थेवर पुन्हा प्रश्नचिन्ह
देशातील सर्वात महत्त्वाच्या वैद्यकीय प्रवेश परीक्षांपैकी एक असलेल्या NEET परीक्षेवर यापूर्वीही अनेकदा प्रश्न उपस्थित झाले आहेत. मात्र, आता थेट प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्या समितीतील सदस्यावरच आरोप झाल्याने परीक्षा व्यवस्थेच्या पारदर्शकतेवर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.
विद्यार्थ्यांचे भविष्य घडवणाऱ्या व्यक्तीकडूनच असा प्रकार घडल्याने पालक, विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये संतापाची भावना व्यक्त केली जात आहे. CBI च्या पुढील तपासात आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
