Jammu Kashmir News : जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यात सुरक्षा दलांनी मोठी दहशतवादविरोधी कारवाई करत दहशतवाद्यांचे गुप्त ठिकाण उद्ध्वस्त केले आहे. या ऑपरेशनमध्ये मोठ्या प्रमाणात स्फोटक साहित्य आणि युद्धसामग्री जप्त करण्यात आली असून परिसरात सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
गुप्त माहितीच्या आधारे चंदोसा परिसरातील नीलसर कांडी भागात संयुक्त शोधमोहीम राबवण्यात आली. या कारवाईत जम्मू-काश्मीर पोलीस, 52 राष्ट्रीय रायफल्स, CRPF ची 53 वी बटालियन आणि SSB ची 2 री बटालियन सहभागी झाली होती. तब्बल सहा तास चाललेल्या या मोहिमेत दहशतवाद्यांचे लपण्याचे ठिकाण शोधून उद्ध्वस्त करण्यात आले.
कारवाईदरम्यान सुरक्षा दलांच्या हाती मोठा शस्त्रसाठा लागला. यात RPG साठी वापरले जाणारे 14 OG-7V फ्रॅगमेंटेशन राउंड्स आणि 9 PG-7P प्रोपेलेंट चार्जेस जप्त करण्यात आले. हे साहित्य अत्यंत धोकादायक मानले जाते आणि मोठ्या हल्ल्यासाठी त्याचा वापर होण्याची शक्यता होती.
ग्रामीण मजुरांसाठी मोठी खुशखबर! ‘जी-राम-जी’ योजनेत आता १२५ दिवस रोजगाराची हमी
घटनास्थळी बॉम्ब डिटेक्शन अँड डिस्पोजल स्क्वॉडने (BDDS) तपासणी करून सर्व स्फोटक साहित्य सुरक्षितरीत्या नष्ट केले. त्यामुळे संभाव्य मोठा धोका टळल्याचे मानले जात आहे.
या प्रकरणी चंदोसा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे. हे स्फोटक साहित्य कुठून आले आणि यामागे कोणते दहशतवादी नेटवर्क सक्रिय आहे, याचा शोध सुरक्षा यंत्रणा घेत आहेत.
दरम्यान, जम्मू-काश्मीरमध्ये सुरू असलेल्या दहशतवादविरोधी मोहिमांमध्ये ही कारवाई महत्त्वाची मानली जात आहे. या यशस्वी ऑपरेशनमुळे सुरक्षा दलांचे मनोबल वाढले असून स्थानिक नागरिकांमध्ये दहशतवादमुक्त काश्मीरची आशा अधिक मजबूत झाली आहे.
