Musaldhar Paus Update : गेल्या आठवड्यात राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे अनेक धरणांतील पाणीसाठ्यात वाढ झाल्याबद्दल समाधान व्यक्त करण्यात आले. काही ठिकाणी पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मात्र गेल्या तीन-चार दिवसांपासून राज्यात बहुतांश ठिकाणी पाऊस सुरू आहे.
मात्र आता बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याची तीव्रता वाढली आहे. त्यामुळे राज्यातील वातावरणात बदल झाला असून, आजपासून म्हणजेच शनिवारपासून पुढील ४-५ दिवस बहुतांश जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे. विदर्भ-मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता आहे. याशिवाय मुंबईसह उपनगरातही पावसाचा अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर काही जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी आवश्यक कामे लवकर पूर्ण करावीत, असा सल्लाही देण्यात आला आहे.
आजपासून राज्याच्या सर्व भागात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुंबईसह उपनगरे, विदर्भ आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दुसरीकडे पुण्यातही पावसाचा अंदाज आहे. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, नंदुरबार, धुळे आणि जळगाव जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोकणातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. ठाणे, पालघर आणि परिसरात आज ढगाळ वातावरण राहणार आहे.
जळगावात पुन्हा पाऊस वाढणार?
दरम्यान, जळगाव जिल्ह्यात गेल्या आठवड्यात जोरदार पाऊस झाला. मात्र, गेल्या दोन-तीन दिवसांपासून जिल्ह्यात थांबलेला पाऊस पुन्हा परतेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. उद्या म्हणजे 1 ते 5 सप्टेंबर दरम्यान जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे.