Sarpmitra Frontline Worker Vima : आपला जीव धोक्यात घालून नागरिकांच्या मदतीला धावणारे आणि वन्यजीव असलेल्या सापांचीही माणसांच्या तावडीतून सुटका करणारे सर्पमित्र आता अधिकृत ओळख मिळवणार आहेत. आता त्यांना ‘फ्रंटलाइन वर्कर’चा दर्जा देण्याची शिफारस महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
अधिकृत ओळख आणि विमा योजना
सर्पमित्रांना लवकरच शासनामार्फत अधिकृत ओळखपत्र देण्यात येणार असून, 10 लाख रुपयांचा अपघाती विमाही मिळणार आहे. ही योजना लागू झाल्यानंतर सर्पमित्रांना ‘अत्यावश्यक सेवा’ व ‘फ्रंटलाइन वर्कर’चा दर्जा प्राप्त होईल. यामुळे सर्पमित्रांच्या सुरक्षिततेचा आणि सामाजिक सन्मानाचा मोठा प्रश्न सुटणार आहे.
सर्पमित्रांची महत्त्वाची भूमिका
गावखेड्यांपासून शहरी वस्त्यांपर्यंत कुठेही साप आढळला की सर्पमित्र तत्काळ घटनास्थळी पोहोचतात. साप विषारी असो वा बिनविषारी – तो जिवंत पकडून जंगलात सोडण्याचं काम हे सर्पमित्र निस्वार्थपणे करत असतात. काहीवेळा साप पकडताना गंभीर दुखापती होतात किंवा जीवही जातो. त्यामुळे त्यांना संरक्षण व मान्यता मिळणे आवश्यक होते.
संख्येत वाढ, पण प्रशिक्षण गरजेचं
अलीकडच्या काळात सर्पमित्रांची संख्या वाढत आहे, मात्र प्रशिक्षित सर्पमित्रांची टक्केवारी कमी आहे. सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी अनेकजण साप पकडण्याचा प्रयत्न करतात, पण त्यामुळे जीवितधोका वाढतो. योग्य प्रशिक्षणाशिवाय साप हाताळणे धोकादायक आहे.
गारुडींची जागा सर्पमित्रांकडे
पूर्वी नाग व साप हाताळणारे गारुडी किंवा नागवाले बाबा होते. पण ती संकल्पना आता लोप पावत चालली आहे. सर्पमित्रच आता नागरी समाजात सापांच्या संदर्भात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. त्यामुळे शासनाचं हे पाऊल स्वागतार्ह ठरणार आहे.