Petrol Pump Toilets Customer Only Kerala High Court : केरळ उच्च न्यायालयाने नुकताच एक महत्त्वाचा आदेश दिला आहे, ज्यात स्पष्ट करण्यात आले आहे की पेट्रोल पंपांवरील शौचालये ही केवळ संबंधित ग्राहकांसाठीच आहेत. सर्वसामान्य जनतेसाठी ही सुविधा खुली नाही.
न्यायमूर्ती सी.एस. डायस यांनी तिरुवनंतपुरम महापालिका आणि राज्य सरकारला सूचना दिल्या की त्यांनी पंपधारकांकडे त्यांच्या खासगी शौचालयांचा वापर सर्वसामान्यांसाठी खुला करण्याचा आग्रह करू नये.
ही सुनावणी पेट्रोल पंप डीलर्स संघटनेसह काही याचिकाकर्त्यांनी दाखल केलेल्या याचिकेवर झाली. यामध्ये असा आरोप करण्यात आला की स्थानिक प्रशासनाने काही पेट्रोल पंपांवर पोस्टर्स चिकटवले आणि त्या शौचालयांना ‘सार्वजनिक शौचालय’ म्हणून घोषित केले.
या कृतीमुळे नागरिकांमध्ये गोंधळ निर्माण झाला असून, मोठ्या प्रमाणात प्रवासी आणि पर्यटक या शौचालयांचा वापर करत आहेत. परिणामी पंप परिसरात गर्दी, वाद, अस्वच्छता आणि सुरक्षेचा प्रश्न उभा राहत आहे, असा याचिकाकर्त्यांचा दावा आहे.
याशिवाय, पेट्रोलियम आणि स्फोटक सुरक्षा संस्थेच्या (PESO) 2018 च्या मार्गदर्शक सूचनांनुसारही, शौचालये ही ग्राहकांनी केवळ आपत्कालीन प्रसंगी वापरण्याच्या उद्देशानेच असावीत, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
त्यामुळे न्यायालयाने दिलेला हा निर्णय पेट्रोल पंपधारकांना दिलासा देणारा असून, भविष्यात स्थानिक प्रशासनाने या शौचालयांचा गैरवापर सार्वजनिक सुविधांसाठी होऊ नये याची खबरदारी घेण्याचे निर्देश दिले आहेत.