सांगली : राज्यातील विविध कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये आज कांदा, लिंबू, आंबा आणि कलिंगडाची मोठ्या प्रमाणात खरेदी-विक्री झाली. काही बाजारांमध्ये मालाची आवक वाढल्यामुळे दरावर दबाव दिसून आला, तर काही ठिकाणी कमी आवकेमुळे दरात वाढ झाली.
राज्यात आज एकूण 1 लाख 74 हजार 221 क्विंटल कांद्याची नोंद झाली. त्यामध्ये नाशिक बाजार समितीत सर्वाधिक 81 हजार 816 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक झाली. मोठ्या प्रमाणात कांदा बाजारात दाखल झाल्यामुळे दरात घसरण दिसून आली. नाशिकमध्ये कांद्याला प्रतिक्विंटल 252 रुपयांपासून 1 हजार 421 रुपयांपर्यंत दर मिळाला.
“अमेरिका-इराण संघर्षाने जग हादरलं! शांतता प्रस्ताव फिस्कटताच तेलाच्या किमती गगनाला”
दरम्यान, धुळे बाजार समितीत कांद्याला तुलनेने चांगला भाव मिळाला. येथे कांद्याचा कमाल दर 1 हजार 990 रुपये प्रतिक्विंटल इतका नोंदवण्यात आला. मात्र अनेक बाजारांमध्ये कांद्याचे दर कमी झाल्याने उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
दुसरीकडे, लिंबाच्या बाजारात मात्र तेजी कायम असल्याचे दिसून आले. राज्यभरात केवळ 240 क्विंटल लिंबाची आवक झाल्याने दरात मोठी वाढ झाली. कोल्हापूर बाजार समितीत 48 क्विंटल लिंबू दाखल झाले होते. येथे लिंबाला सरासरी 10 हजार रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला, तर उच्चांकी दर 12 हजार 500 रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोहोचला.
आंबा आणि कलिंगडाच्या बाजारातही सध्या चांगली उलाढाल सुरू असून उन्हाळ्यामुळे ग्राहकांची मागणी टिकून आहे. काही बाजारांमध्ये आवक स्थिर असल्याने दरात फारसा बदल झालेला दिसून आला नाही.
