नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयचं पथक लातूरमध्ये अडकलं; चौकशीदरम्यान लिफ्ट बंद पडल्याने खळबळ

Author Picture
Published On: May 22, 2026
नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयचं पथक लातूरमध्ये अडकलं; चौकशीदरम्यान लिफ्ट बंद पडल्याने खळबळ

देशभर गाजत असलेल्या नीट पेपरफुटी प्रकरणात आता लातूरमधून मोठी आणि धक्कादायक घडामोड समोर आली आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी आलेलं सीबीआयचं पथक चौकशीदरम्यान अचानक लिफ्टमध्ये अडकल्याची घटना घडली. काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. मात्र, सुदैवाने थोड्याच वेळात अधिकाऱ्यांची सुरक्षित सुटका करण्यात आली.

नेमकं काय घडलं ?

नीट पेपरफुटी प्रकरणाचा तपास सध्या सीबीआयकडून वेगाने सुरू आहे. याच तपासाच्या अनुषंगाने सीबीआयचं विशेष पथक आज लातूरमध्ये दाखल झालं होतं. या पथकाने आरोपी डॉ. मनोज शिरुरे यांच्या घरासह हॉस्पिटल आणि परिसरातील काही ठिकाणी चौकशी केली.

दरम्यान, मनोज शिरुरे यांच्या घराशेजारी असलेल्या मयुरेश्वर अपार्टमेंटमध्ये तपासासाठी जात असताना अचानक वीजपुरवठा खंडित झाला आणि सीबीआय अधिकारी लिफ्टमध्ये अडकले. काही वेळ अधिकाऱ्यांना लिफ्टमध्येच थांबावं लागलं. घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी आणि तांत्रिक कर्मचाऱ्यांनी तत्काळ धाव घेतली आणि काही वेळात अधिकाऱ्यांची सुरक्षित सुटका करण्यात आली.


लातूरमधून तिसरी अटक

या प्रकरणात सीबीआयने प्रथमच एका पालकावर थेट कारवाई केली आहे. लातूरमधील प्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ डॉ. मनोज शिरुरे यांना अटक करण्यात आली आहे. तपासादरम्यान ते यापूर्वी अटक झालेल्या पी. व्ही. कुलकर्णी आणि मोटेगावकर यांच्या संपर्कात असल्याचं उघड झालं आहे.

सीबीआयच्या प्राथमिक तपासानुसार, मनोज शिरुरे यांनी आपल्या मुलासाठी मोटेगावकरकडून नीटचा पेपर मिळवल्याचा आरोप आहे. या धक्कादायक खुलास्यानंतर सीबीआयने त्यांना ताब्यात घेतलं.


अंबाजोगाईतील विद्यार्थ्यांचीही चौकशी

या प्रकरणाचे धागेदोरे आता राज्यातील विविध भागांपर्यंत पोहोचत आहेत. अंबाजोगाई येथील दोन विद्यार्थ्यांचीही सीबीआयने चौकशी केली आहे. चौकशीनंतर या विद्यार्थ्यांना पुढील तपासासाठी सोबत नेल्याची माहिती समोर आली आहे.


देशभरात संतापाचं वातावरण

नीट परीक्षा ही मेडिकल क्षेत्रात प्रवेशासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. मात्र, पेपरफुटीच्या आरोपांमुळे लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. या प्रकरणामुळे देशभरात संतापाची लाट उसळली होती. त्यानंतर सरकारने परीक्षा रद्द करत संपूर्ण तपास सीबीआयकडे सोपवला.

सीबीआयच्या तपासातून दररोज नवे खुलासे समोर येत असून, या रॅकेटमध्ये आणखी मोठी नावं समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

नमस्कार! मी उदय लहासे. सरकारी योजना, शेती, टेक्नॉलॉजी आणि ताज्या अपडेट्स वाचकांपर्यंत सोप्या भाषेत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. लोकांना योग्य माहिती योग्य वेळी मिळावी, हा माझा उद्देश आहे. Gore Sarkar वर तुम्हाला उपयुक्त आणि विश्वासार्ह माहिती नियमित मिळेल.… Read More

Related News
💬 Join WhatsApp