Pooja Japan Science Success Story : उत्तर प्रदेशातील बाराबंकी जिल्ह्यातील अगेहरा गावात राहणारी पूजा ही आज लाखो विद्यार्थ्यांसाठी एक प्रेरणास्त्रोत ठरली आहे. विज्ञानावरील नितांत आवड आणि जिद्द याच्या जोरावर पूजाने थेट जपानमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं. पण आजही पूजाच्या घरात ना वीज आहे, ना शौचालय.
पूजाचे वडील पुट्टीलाल हे मजुरी करतात आणि आई सुनीला देवी ही सरकारी शाळेत मदतनीस आहे. कुटुंबात आर्थिक हालअपेष्टा असूनसुद्धा पूजाची शिकण्याची तळमळ अद्वितीय आहे. ती अजूनही दिवा लावून अभ्यास करते आणि घरातील जबाबदाऱ्या उचलते.
विज्ञानाच्या दुनियेतून जपानपर्यंतचा प्रवास
पूजा आठवीमध्ये असताना तिने एक नावीन्यपूर्ण ‘धूळमुक्त थ्रेशर मशीन’ बनवलं. शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरणाऱ्या या उपकरणामुळे धूळ बॅगेत गोळा होते, त्यामुळे विद्यार्थ्यांना आणि परिसराला त्रास होत नाही. पूजाने स्वतःच्या घरखर्चातून ३ हजार रुपये खर्च करून हे मॉडेल तयार केलं.
या विज्ञान मॉडेलला जिल्हा, विभाग, राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर मान्यता मिळाली. २०२४ मध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या राष्ट्रीय विज्ञान मेळाव्यातही हे मॉडेल निवडण्यात आलं. आणि मग, २०२५ मध्ये भारत सरकारकडून पूजाची निवड जपानमधील शैक्षणिक दौऱ्यासाठी करण्यात आली.
घरात वीज नाही, पण स्वप्न मोठं आहे!
जपानहून परतल्यानंतर पूजाने सांगितलं की, “प्रतिभा संसाधनांवर अवलंबून नसते.” तिचं स्वप्न आहे – आपल्या गावातील गरीब मुलांना शिकवायचं आणि त्यांना योग्य दिशा द्यायची.
दुर्दैव म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांनी वीज कनेक्शन मंजूर केलं असलं तरी घरात वीज अजूनही आलेली नाही. केवळ खांबापासून केबल टाकण्यासाठी लागणारे पैसे कुटुंबाकडे नाहीत. वीजमीटर घरात असूनही दिव्याच्या प्रकाशात पूजाला अभ्यास करावा लागतो. शौचालयाचीही अवस्था अशीच आहे.
प्रशासनाला हाक
एकीकडे पूजा जपानमध्ये देशाचं नाव उजळवत आहे, आणि दुसरीकडे तिच्या घरात मूलभूत सुविधा नाहीत – हे चित्र व्यवस्थेच्या सद्यस्थितीवर मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित करतं. स्थानिक नागरिक आणि शिक्षकवर्ग प्रशासनाकडे मागणी करत आहेत की, पूजासारख्या विद्यार्थिनीला तात्काळ संधी, सुविधा आणि आधार द्यावा.