St Karmachari Accident Insurance Sbi : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे (एसटी) हजारो कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) ‘कार्पोरेट सॅलरी पॅकेज’ (CSP) योजनेअंतर्गत एसटी कर्मचाऱ्यांना 1 कोटी रुपयांपर्यंत अपघाती विम्याचे संरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे.
महामंडळ आणि स्टेट बँक यांच्यात यासंदर्भात सामंजस्य करार झाला असून, या योजनेचे परिपत्रक सर्व विभाग नियंत्रक कार्यालयांना पाठवण्यात आले आहे.
Table of Contents
विमा योजना कशी असेल?
या नव्या योजनेमुळे ड्युटीवर असो वा नसले तरी अपघातामध्ये मृत्यू झाल्यास संबंधित कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला 1 कोटी रुपयांपर्यंतचा विमा लाभ मिळणार आहे.
इतर कारणांमुळे मृत्यू झाल्यास 6 लाख रुपयांपर्यंतचा ग्रुप टर्म इन्शुरन्स लागू होणार आहे.
त्याचप्रमाणे, एसबीआय सीएसपी खात्यातून पैसे काढून विमानप्रवास करताना अपघात झाला, तर हवाई प्रवास विमाही लागू होईल.
85% कर्मचाऱ्यांचे खाते स्टेट बँकेत
एसटीमध्ये सध्या सुमारे 92,000 कर्मचारी कार्यरत आहेत. यामध्ये 80 ते 85 टक्के कर्मचाऱ्यांचे वेतन स्टेट बँकेत जमा होते. आता या नव्या विमा योजनेमुळे उर्वरित कर्मचारीदेखील स्टेट बँकेत खाते उघडण्याची शक्यता आहे.
सहकारी बँकेसमोरील संकट
सध्या काही एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑपरेटिव्ह बँकेतही येते. मात्र नवीन विमा लाभ केवळ स्टेट बँकेतील खातेदारांना मिळणार असल्याने सहकारी बँकेचे भविष्य अंधारात जात असल्याची चिंता व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने या बँकेसाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी कामगार संघटनांनी केली आहे.
आतापर्यंत फक्त 1 लाखाची मदत
या अगोदर अपघातामुळे कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास केवळ 1 लाख रुपयांची मदत महामंडळाकडून मिळत होती. मात्र नवीन विमा योजनेमुळे कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना मोठा आर्थिक आधार मिळू शकतो.
टीप: या लेखात दिलेल्या माहितीचा उद्देश केवळ जनहितासाठी आहे. योजनेतील अटी व शर्ती संबंधित बँकेच्या शाखेकडून अधिकृतपणे समजावून घ्याव्यात.