Shegaon Ashadhi Ekadashi Night Darshan : आषाढी एकादशी निमित्त शेगाव येथील श्री संत गजानन महाराज मंदिर शनिवार, ५ जुलैच्या रात्रीपासून रात्रभर दर्शनासाठी खुले राहणार आहे. पंढरपूरला जाऊ न शकलेल्या भाविकांसाठी शेगाव हे विदर्भातील ‘प्रति पंढरी’ मानले जाते. त्यामुळे मराठवाडा, खान्देश, जळगाव आणि विदर्भातील हजारो भाविक याठिकाणी दर्शनासाठी गर्दी करतात.
गर्दीमुळे कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये यासाठी संस्थानने शनिवार रात्रीपासून ते रविवारी दिवसभर मंदिर दर्शनासाठी खुले ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
आषाढी एकादशीच्या दिवशी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, यात काकडा भजन, प्रवचन, हरिपाठ, श्रींची पालखी परिक्रमा आणि रात्री कीर्तनाचा समावेश आहे.
दर्शनासाठी विशेष रचना करण्यात आली असून, श्रीमुख दर्शनबारी, महाप्रसाद, पारायण यांसारख्या सुविधा उपलब्ध असतील. भक्तनिवासामध्ये अल्पदरात राहण्याची व्यवस्था आहे. सेवेकरी भाविकांच्या सेवेसाठी तत्पर राहणार आहेत.