मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अलीकडेच पक्षाच्या मेळाव्यात जैन मुनी निलेशचंद्र यांच्यावर केलेल्या टीकेनंतर आता या वादाला नवे वळण मिळाले आहे. जैन मुनी निलेशचंद्र यांनी राज ठाकरेंच्या वक्तव्याला जोरदार प्रत्युत्तर देत थेट आव्हान दिले आहे.
Table of Contents
‘दाढी फक्त वाघालाच असते, मी अभिमानाने मराठी’
प्रतिक्रिया देताना निलेशचंद्र म्हणाले, “दाढी फक्त वाघालाच असते आणि मला अभिमान आहे की माझा जन्म मराठी कुटुंबात झाला आहे. जैन आणि सनातन धर्माच्या रक्षणासाठी मी संपूर्ण महाराष्ट्रभर दौरा करणार आहे.”
त्यांनी पुढे राज ठाकरेंना उद्देशून म्हटले, “जर तुमच्या मनगटात खरोखरच ताकद असेल, तर मुंब्रा, कल्याण आणि भिवंडीमध्ये जाऊन दाखवा. मात्र, तिथे जाण्याचे धाडस तुम्ही करू शकत नाही. मी सनातनी असून सनातन धर्मासाठी शेवटपर्यंत संघर्ष करत राहणार आहे. समाजासाठी माझे बलिदान द्यावे लागले तरी मी मागे हटणार नाही.”
‘धर्माविरोधात राजकारण झाले तर निलेशचंद्र समोर उभा राहील’
राजकारणात हस्तक्षेप केल्याच्या टीकेलाही निलेशचंद्र यांनी उत्तर दिले. ते म्हणाले, “जर राजकारण धर्माच्या विरोधात जाईल, समाजावर अन्याय करेल किंवा धार्मिक भावना दुखावण्याचा प्रयत्न करेल, तर हा निलेशचंद्र त्याविरोधात ठामपणे उभा राहील.”
वैयक्तिक टीकेबाबत बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, “माझे केस कसे आहेत, हा माझा वैयक्तिक विषय आहे. त्याबाबत कुणालाही उत्तर देण्याचे बंधन माझ्यावर नाही.”
मोदी-योगींच्या विरोधकांवरही साधला निशाणा
निलेशचंद्र यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या विरोधकांवरही अप्रत्यक्ष टीका केली. तसेच दादरमधील कबुतरांच्या वादाला काही राजकीय नेत्यांनी स्वतःच्या फायद्यासाठी हवा दिल्याचा आरोप त्यांनी केला.
नेमके काय म्हणाले होते राज ठाकरे?
मनसेच्या मेळाव्यात कार्यकर्त्यांना संबोधित करताना राज ठाकरे यांनी पांढऱ्या पट्ट्या आणि जैन समाजाशी संबंधित वादावर भाष्य केले होते. त्यावेळी त्यांनी जैन मुनी निलेशचंद्र यांच्यावर अप्रत्यक्ष टीका करत त्यांच्या दाढी आणि व्यक्तिमत्त्वावर भाष्य केले होते.
तसेच, “मराठी माणसाच्या मनगटाची ताकद कधी पाहिली आहे का? आम्हाला कोणताही वाद नको आहे, मात्र जर कोणी वाद उकरून काढण्याचा प्रयत्न केला, तर आम्ही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही,” असा इशाराही राज ठाकरे यांनी दिला होता.
राजकीय वादाला नवे वळण
राज ठाकरे आणि जैन मुनी निलेशचंद्र यांच्यातील या शाब्दिक संघर्षामुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापण्याची चिन्हे दिसत आहेत. दोन्ही बाजूंनी आक्रमक भूमिका घेतल्यामुळे हा वाद आगामी काळात आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.









