Ladki Bahin Yojna Karvahi Mahila Karmachari 2025 : राज्य सरकारने सुरू केलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’अंतर्गत अपात्र लाभार्थ्यांकडून लाभ घेतल्याच्या घटना समोर आल्या आहेत. यामध्ये तब्बल ९,५२६ महिला सरकारी कर्मचारी नियमबाह्यरित्या लाभ घेत असल्याचे स्पष्ट झाले असून, आता त्यांच्यावर कारवाई होणार आहे.
ही माहिती २९ जुलै रोजी प्रसिद्ध झालेल्या वृत्तातून उघड झाली. संबंधित महिलांनी मागील १० महिन्यांत सुमारे १४.५ कोटी रुपयांचा लाभ घेतला आहे. हे पैसे सरळ त्यांच्या बँक खात्यात जमा झाले असल्याने पुराव्याची वेगळी गरज भासत नाही.
सामान्य प्रशासन विभागाने या प्रकरणाची दखल घेत सर्व विभागांना कारवाईचे आदेश दिले आहेत. महाराष्ट्र नागरी सेवा नियमांनुसार संबंधित महिला कर्मचाऱ्यांकडून ही रक्कम वसूल केली जाईल आणि आवश्यक ती शिस्तभंगाची कारवाईही केली जाणार आहे. यात वेतनवाढ रोखणे, दंड आकारणे यासारख्या कठोर उपाययोजना करण्यात येणार आहेत.
महिला व बालकल्याण विभाग आणि माहिती-तंत्रज्ञान विभागाच्या संयुक्त पडताळणीनंतर हे प्रकरण उजेडात आले आहे. गैरफायदा घेणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांची यादी संबंधित विभागांना लवकरच पाठवली जाणार आहे.
राज्याचे मुख्य सचिव राजेश कुमार यांनी यासंदर्भात घेतलेल्या बैठकीत, नियमांचा जाणीवपूर्वक भंग करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई केली जावी, यावर सर्व विभागांनी सहमती दर्शवली. अन्यथा अशा घटनांमुळे भविष्यात इतर कर्मचाऱ्यांमध्येही नियम तोडण्याची प्रवृत्ती वाढू शकते, असा इशारा बैठकीत देण्यात आला.
दरम्यान, लाडकी बहीण योजनेच्या जुलै महिन्याच्या मानधनासाठी २,९८४ कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत. मात्र या कारवाईच्या पार्श्वभूमीवर गैरप्रकार करणाऱ्या इतर अपात्र लाभार्थ्यांमध्येही चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, विशेषतः ग्रामीण भागात ही चर्चा चांगलीच रंगली आहे.