Ladki Bahin Yojana Purush Labharthi Karvai : राज्य सरकारच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ अंतर्गत तब्बल 14 हजार पुरुषांनी लाभ घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणावर महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे आणि गरज पडल्यास कारवाई केली जाईल, असंही त्यांनी सूचित केलं.
आदिती तटकरे म्हणाल्या, “या योजनेतून अनेक महिलांना आनंदाचे क्षण मिळाले. मात्र काही पुरुषांनी अर्ज भरल्याचं समोर आलं आहे. योजनेची घोषणा 28 जून रोजी झाली आणि अर्ज करण्याची अंतिम मुदत 15 ऑक्टोबर होती. या कालावधीत काही महिलांच्या खात्याऐवजी कदाचित पुरुषांचे खाते दिलं गेलं असेल, पण याबाबतची तपासणी सुरू आहे.”
तटकरे पुढे म्हणाल्या, “महिलेचे स्वतःचे खाते नसल्यामुळे पुरुषांचे खाते वापरण्यात आले असेल, अशी शक्यता आहे. मात्र प्रत्यक्षात पुरुषांनी अर्ज भरले का, याची खात्री छानणीनंतरच होणार आहे. यापूर्वी अपात्र महिलांचे अर्ज रद्द करण्यात आले आहेत, आणि त्याच पद्धतीने चुकीचा लाभ घेणाऱ्यांवर कारवाई केली जाईल.”
तटकरे यांनी एक गंभीर मुद्दा उचलला – “एका व्यक्तीने तब्बल 30-35 बँक अकाऊंट योजनेला जोडले होते, अशा प्रकरणांमध्ये आम्ही संबंधित अकाऊंट्स सील केले आहेत. कोणताही अपात्र व्यक्ती लाभ घेऊ नये, यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे.”
या सगळ्या पार्श्वभूमीवर, जर पुरुषांनी लाडकी बहीण योजनेचा जाणीवपूर्वक गैरवापर केला असेल, तर त्यांच्यावर लवकरच कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे.