Ladki Bahin Yojana Portal Bandh Navi Mahila Vanchit : महाराष्ट्र सरकारने मोठ्या जाहिरातीसह सुरू केलेली लाडकी बहिण योजना सध्या वादात सापडली आहे. योजनेचे पोर्टल गेल्या सहा महिन्यांपासून बंद आहे, त्यामुळे जुलै 2024 नंतर 21 वर्षे पूर्ण करणाऱ्या महिलांना अद्याप या योजनेचा लाभ मिळालेला नाही. यामुळे राज्यातील अनेक महिलांमध्ये नाराजी आहे.
2024 च्या निवडणुकीपूर्वी सुरू झालेल्या या योजनेअंतर्गत 21 ते 65 वयोगटातील महिलांना दरमहा ₹1500 ची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली होती. मात्र, पोर्टल बंद असल्यामुळे अनेक महिलांचे अर्ज प्रलंबित आहेत किंवा तांत्रिक त्रुटींमुळे नाकारले गेले आहेत.
महिलांच्या प्रतिक्रिया: “आम्ही मुख्यमंत्री यांच्या बहिणी नाही का?”
नव्याने पात्र झालेल्या महिलांना या योजनेत समाविष्ट न केल्याने महिलांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. “आम्ही मुख्यमंत्री यांच्या बहिणी नाही का?” असा सवाल महिलांकडून केला जात आहे. अर्जात तांत्रिक चुका असणाऱ्या महिलांनाही अद्याप मार्गदर्शन मिळालं नाही.
तांत्रिक अडचणी, दुर्लक्षित महिला
पोर्टल बंद असल्यामुळे तांत्रिक चुका सुधारण्याची कोणतीही सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे ज्या महिलांनी पात्रता पूर्ण केली आहे, त्यांचाही सहभाग होऊ शकलेला नाही. शासनाकडून ना माहिती मिळते, ना मदत. हे पोर्टल तातडीने सुरू करून नव्या पात्र महिलांचा समावेश होणे अत्यावश्यक आहे.
निवडणुकीवर परिणाम होण्याची शक्यता?
लाडकी बहिणींचे राजकीय महत्त्व सत्ताधाऱ्यांना माहिती आहे. विधानसभा निवडणुकीत जसे त्यांचे योगदान महत्त्वाचे होते, तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत देखील याचे परिणाम होऊ शकतात. त्यामुळे सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे.
18 वर्षांनंतर मतदानाचा अधिकार, पण 21 वयानंतरच बहिण?
महिलांना 18 वयानंतर मतदानाचा हक्क आहे, मग लाडकी बहिण योजना 21 वयानंतरच का? असा प्रश्नही उपस्थित होत आहे. शासनाने या योजनेच्या वयोगटाची पुन्हा एकदा फेरआढावा घेणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे, नव्याने पात्र झालेल्या महिलांना तात्काळ या योजनेचा लाभ देणे आवश्यक आहे.