Gharpoch e Kyc Shasan Aplya Dari : जिल्ह्यात संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावणबाळ निवृत्तिवेतन योजनेच्या लाभार्थ्यांना केवायसी प्रक्रियेअभावी मानधन मिळण्यास विलंब होत आहे. ही अडचण लक्षात घेऊन ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत घरपोच ई-केवायसी मोहिम हाती घेण्यात आली आहे.
आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या सूचनेनुसार प्रशासनाने लाभार्थ्यांच्या घरी जाऊन ई-केवायसी पूर्ण करण्यास सुरुवात केली आहे. या उपक्रमात आतापर्यंत १,४३१ लाभार्थ्यांची केवायसी प्रक्रिया पूर्ण झाली असून, अजून ९,३३७ लाभार्थींची प्रक्रिया प्रलंबित आहे. आठवड्याभरात दीड हजार लोकांपर्यंत ही सेवा पोहोचली आहे.
ज्यांची ई-केवायसी प्रक्रिया बाकी आहे, त्यांनी पुढाकार घेऊन ग्रामसेवक, तलाठी, महसूल कर्मचारी अथवा स्थानिक कार्यकर्त्यांशी संपर्क साधावा. संबंधित कर्मचारी लाभार्थ्यांच्या घरी जाऊन ही प्रक्रिया पूर्ण करत आहेत.
सामाजिक न्याय विभागाच्या योजनांचा उद्देश म्हणजे आर्थिकदृष्ट्या दुर्बल, अडचणीत असलेल्या, वृद्ध, अपंग, विधवा, अनाथ नागरिकांना मासिक आर्थिक सहाय्य देणे. हे सहाय्य थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केले जाते.
जिल्ह्यात संजय गांधी निराधार योजनेचे सुमारे ४१ हजार लाभार्थी आहेत, त्यातील ८,०९७ जणांची ई-केवायसी प्रक्रिया अपूर्ण आहे. श्रावणबाळ योजनेतील ५१ हजारांहून अधिक लाभार्थ्यांपैकी १,२४० जणांचे केवायसी न झाल्याने त्यांना मानधन थांबले आहे.
ई-केवायसी झाल्याशिवाय लाभ अडतो, त्यामुळे हे काम तातडीने पूर्ण करणे गरजेचे आहे. प्रशासनाचा यावर सातत्यानं पाठपुरावा सुरू आहे.