Falbag Lagvad Yojana Fruit Tree Plantation : शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता तुम्ही तुमच्या शेतात, शेताच्या कडेला किंवा पडीक जमिनीत देखील २० हून अधिक प्रकारच्या फळपिकांची लागवड करू शकता. विशेष म्हणजे यासाठी शासनामार्फत आर्थिक मदत देखील मिळणार आहे.
कोणत्या झाडांची लागवड करता येते?
या योजनेअंतर्गत फळझाडे, फुलझाडे, मसालापिके, तसेच काही विदेशी फळांची लागवड करता येते. यामध्ये आंबा, काजू, डाळिंब, पेरू, चिकू, संत्रा, मोसंबी, नारळ, जांभूळ, सीताफळ, आवळा, फणस, अंजीर, केळी, द्राक्ष अशा पारंपरिक फळांपासून ते ड्रॅगन फ्रुट, ॲव्होकाडो यांसारख्या विदेशी फळांपर्यंत अनेक पर्याय उपलब्ध आहेत.
याशिवाय गुलाब, मोगरा, निशिगंध, सोनचाफा यांसारखी फुलझाडं आणि लवंग, मिरी, जायफळ, दालचिनी यांसारखी मसालापिकेही लावता येतात.
लागवड कधी करता येते?
लागवडीचा योग्य कालावधी म्हणजे जून ते मार्च. जर तुमच्याकडे सिंचनाची सुविधा असेल, तर मार्चपर्यंत लागवड करता येईल.
कोण लाभ घेऊ शकतो?
या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्या नावावर जमीन असणं आवश्यक आहे. तसेच जॉबकार्ड असणे अनिवार्य आहे. अनुसूचित जाती-जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, महिला कुटुंबप्रमुख, दिव्यांग व्यक्ती, गरीब कुटुंबे अशा विविध प्रवर्गातील शेतकरी पात्र आहेत.
किती क्षेत्र लागवडीसाठी?
शेतकरी किमान ०.०५ हेक्टर ते कमाल २ हेक्टर क्षेत्रावर लागवड करू शकतात.
अनुदान कसं मिळेल?
लागवडीनंतर फळझाडे जिवंत ठेवणाऱ्या लाभार्थ्यांना दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षी अनुदान दिलं जातं. बागायती पिकांसाठी ९०% आणि कोरडवाहू पिकांसाठी ७५% अनुदानाची तरतूद आहे.
कुठे संपर्क करावा?
या योजनेची अंमलबजावणी जिल्हा, तालुका आणि मंडळ कृषी अधिकारी कार्यालयामार्फत केली जाते. अधिक माहितीसाठी आपल्या नजिकच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा.