Ashadhi Wari St Karmaacharyanna Mofat Bhojan : आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरात लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात. या भाविकांच्या सोयीसाठी यंदा एसटी महामंडळाकडून ५,२०० बसगाड्यांची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. या सेवेमध्ये सहभागी असलेल्या एसटीचे चालक, वाहक, यांत्रिक कर्मचारी, पर्यवेक्षक आणि अधिकारी यांच्यासाठी मोफत चहा, नाश्ता आणि जेवण पुरवले जाणार आहे.
ही सुविधा ५ ते ७ जुलैदरम्यान चंद्रभागा, भिमा, विठ्ठल आणि पांडुरंग या बसस्थानकांवर उपलब्ध असेल. अंदाजे १३,००० कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे.
आषाढी वारीदरम्यान एसटी कर्मचारी अत्यंत निष्ठेने सेवा देतात. त्यांच्या आरोग्याची व गरजांची काळजी घेत, त्यांना अन्नाची अडचण भासू नये म्हणून ही मोफत भोजन व्यवस्था करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या तीन दिवसांत उपवासाच्या पद्धतीनुसारच अन्नपदार्थ दिले जाणार आहेत.
हा उपक्रम दरवर्षी राबवण्याचा संकल्प करण्यात आला असून, एसटी कर्मचार्यांच्या सेवेला सलाम करण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे.