Anath Vidyarthi Free Professional Education Yojana 2025 : राज्यातील अनाथ विद्यार्थ्यांना आता व्यावसायिक शिक्षण पूर्णपणे मोफत मिळणार आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी जाहीर केले की, शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून या विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क आणि परीक्षा शुल्कात १०० टक्के सूट दिली जाणार आहे.
ही सवलत अशा विद्यार्थ्यांसाठी लागू असेल, ज्यांचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न रु. ८ लाखांपर्यंत आहे. यामध्ये सर्व शासकीय, अनुदानित, अंशतः अनुदानित आणि कायम विनाअनुदानित महाविद्यालये, तंत्रनिकेतने, तसेच सार्वजनिक आणि शासकीय अभिमत विद्यापीठांमधील व्यावसायिक अभ्यासक्रम समाविष्ट आहेत. मात्र, खाजगी अभिमत आणि स्वयं-अर्थसहाय्यित विद्यापीठे या योजनेपासून वगळण्यात आले आहेत.
योजना केवळ केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेअंतर्गत (CAP) प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीच लागू असेल. व्यवस्थापन कोट्यात किंवा संस्थास्तरावर घेतलेला प्रवेश यामध्ये धरला जाणार नाही.
पहिल्या वर्षानंतरही लाभ सुरूच
या योजनेचा लाभ विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाच्या संपूर्ण कालावधीत मिळणार असून, पहिल्या वर्षी लाभ घेतल्यानंतर पुढील वर्षांसाठी अर्जाचे नुतनीकरण आवश्यक असेल.
ऐच्छिक लाभाची मुभा
अनाथ विद्यार्थ्यांना त्यांच्या सामाजिक प्रवर्गानुसार शिष्यवृत्ती योजनांचा लाभ किंवा या १००% शैक्षणिक सवलतीचा लाभ घेण्याचा पर्याय असेल. मात्र, दोन्ही योजना एकाचवेळी लागू करता येणार नाहीत. संस्थेमार्फत सर्व शैक्षणिक सुविधा विद्यार्थ्यांना विनामूल्य दिल्या जातील.
अनाथ विद्यार्थ्यांसाठी राखीव जागा
शासकीय, निमशासकीय आणि अनुदानित शिक्षण संस्थांमध्ये अनाथ विद्यार्थ्यांसाठी १% आरक्षण लागू करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे, दिव्यांगांसारखेच, शासकीय व निमशासकीय नोकरभरती प्रक्रियेत देखील अनाथ विद्यार्थ्यांसाठी १% आरक्षणाची तरतूद करण्यात आली आहे.