शिक्षण मंत्री दादा भुसे यांची विधान परिषदेत घोषणा
School Contractual Class Iv Recruitment Maharashtra : राज्यातील शाळांमध्ये शिपाई आणि इतर चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची भरती आता कायमस्वरूपी न होता, कंत्राटी पद्धतीने केली जाणार आहे. ही अधिकृत घोषणा राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी विधान परिषदेत केली.
श्री. भुसे यांनी स्पष्ट केले की, जे कर्मचारी सध्या शाळांमध्ये कार्यरत आहेत, ते निवृत्त होईपर्यंत आपल्या पदावर राहतील. मात्र त्यानंतर त्यांच्या जागी नवीन भरती कंत्राटी पद्धतीनेच केली जाईल.
शाळांमधील घटती विद्यार्थ्यांची संख्या, शाळाबाह्य विद्यार्थी आणि गुणवत्तेच्या बाबतीत शासन गंभीर असून, त्यावर उपाययोजना राबवण्यात येत आहेत. यु-डायस (UDISE) प्रणालीनुसार काही प्रमाणात विद्यार्थ्यांची संख्या घटली आहे, मात्र त्यामागील कारणांची चौकशी करून आवश्यक पावले उचलली जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
विरोधकांचा जोरदार विरोध
या घोषणेमुळे विधान परिषदेत जोरदार गदारोळ झाला. विरोधकांनी ही भरती कायमस्वरूपीच व्हावी, अशी ठाम मागणी केली. शाळांमध्ये मुलींची संख्या अधिक असून त्यांच्या सुरक्षेसाठी अनुभवी आणि स्थिर कर्मचारी आवश्यक असल्याचे विरोधकांचे म्हणणे होते. त्यामुळे ही कंत्राटी पद्धत अन्यायकारक ठरू शकते, असे ते म्हणाले.